कल्याणात साकारतेय रिअल लाइफ ‘झुंड’ स्टोरी
डोंबिवली | प्रतिनिधी :
फुटबॉलसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान असलेल्या खेळामध्ये स्थानिक मुलांचा सहभाग वाढवण्यासाठी केडीएमसीच्या शाळांमध्ये सुरू झालेला उपक्रम उल्लेखनीय ठरत आहे.
कल्याण महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळांतर्गत असणाऱ्या नागरी विद्यालयात ‘झुंड’ सिनेमातील प्रेरणादायी कथा आता वास्तवात उतरत आहे. महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी फुटबॉल मैदानावर दमदार कामगिरी करत आहेत.
या उपक्रमामागे नगरसेवक स्पेशल एज्युकेशन रवींद्र पवार यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन तर मुख्य प्रशिक्षक म्हणून लेस्टर पीटर यांचे योगदान आहे. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना फुटबॉल प्रशिक्षण देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली असून, सध्या २५ मुलं आणि २५ मुली नियमित प्रशिक्षण घेत आहेत.
महानगरपालिकेच्या शाळांमधून सुमारे ५० विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत. या शिबिरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ शारीरिक तंदुरुस्ती नव्हे, तर शिस्त, आत्मविश्वास आणि संघभावना वाढीस लागली आहे.
महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी डॉ. विश्वास आयुक्त डांगे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “फुटबॉलसोबत खो-खो, कबड्डी, कुस्ती, क्रिकेट यांसारख्या खेळांमध्येही विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा.”
या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील विद्यार्थीही क्रीडाक्षेत्रात प्रगती करत असून, अनेक विद्यार्थी व्यावसायिक फुटबॉल प्रशिक्षणाकडे वळत आहेत.
🗓️ Published Date: December 2022
📰 Source: Pudhari (newspaper.pudhari.co.in)
📍 Location: Kalyan-Dombivli

